वैनगंगा नदीकाठी वसलेले हे गाव धार्मिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि नैसर्गिक वारशाने समृद्ध आहे. स्वयंभू भगवान नरसिंहा मंदिर आणि नरसिंह टेकडी हे या ठिकाणचे मुख्य आध्यात्मिक केंद्र असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वामी सीताराम जी महाराज आणि परमपूज्य ब्रह्मलीन श्री श्री 1008 राजयोगी संत हनुमान दाजी अण्णाजी महाराज यांच्या पावन उपस्थितीने या भूमीला पावित्र्याची देणगी लाभली आहे. डिसेंबर महिन्यात आयोजित होणारी वार्षिक यात्रा राज्य व देशभरातून हजारो भाविकांना आकर्षित करते. माडगीचा औद्योगिक इतिहासही तितकाच गौरवशाली आहे. आशिया खंडातील पहिला मॅगनीज शुद्धीकरण कारखाना “खंबाटा” येथे उभारला गेला होता. देशभरातून विविध प्रकारचे इस्पात आणून त्याचे शुद्धीकरण करून लोखंडी प्लेट्स तयार केल्या जात आणि त्या विदेशातही निर्यात केल्या जात. समुद्रकिनाऱ्याला नसलेल्या ग्रामीण भागातील या गावातील औद्योगिक प्रगती महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
प्राकृतिक दगडी पांढरी टेकडी, वर्षभर वाहणारी वैनगंगा नदी व अस्थिविसर्जन घाट हे गावाला पर्यावरणीय आणि धार्मिक दृष्टीने अनोखे स्थान प्राप्त करून देतात. गावाशी रेल्वे आणि रस्ते नेटवर्क चांगले जोडलेले असून शिक्षण, आरोग्य, सामाजिक ऐक्य व राजकीय सजगता या सर्व बाबतींत गावाने भक्कम पायाभूत प्रगती साधली आहे. ग्रामपंचायत माडगीची स्थापना १ मे १९५६ रोजी झाली असून गावाची एकूण लोकसंख्या २६७८ आहे. वैनगंगा नदीच्या परिसरातील हे गाव नैसर्गिक संपदेने समृद्ध असून गावात प्रवेश करताच भव्य आणि आकर्षक गाव प्रवेशद्वार (गेट) पर्यटकांचे स्वागत करते.गावात प्रवेश केल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लावलेली हिरवीगार झाडे गावाचे सौंदर्य अधिक खुलवितात. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सांस्कृतिक जतन यासाठी माडगी ग्रामस्थ अत्यंत पुढाकाराने काम करतात.
“एक गाव – एक कार्यक्रम” या उपक्रमांतर्गत गावात नियमित पर्यावरणपूरक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. विशेष म्हणजे दर रविवारी गावातील नागरिक एकत्र येऊन गाव स्वच्छतेचे कार्य करतात, ज्यामुळे माडगी हे स्वच्छ, सुंदर व आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला येत आहे.
गावाच्या इतिहासाला उत्तुंग परंपरेची साथ आणि विकासाच्या वाटचालीची दिशा लाभलेली आहे. आजचा माडगी गाव हा केवळ भूतकाळाचा वारसदार नसून आधुनिकतेकडे सक्षमपणे वाटचाल करणारा प्रगतिशील समुदाय आहे. परंपरा, संस्कृती, ऐक्य आणि विकास यांचा सुंदर संगम जपत माडगी ग्रामपंचायत पुढील पिढ्यांसाठी आदर्श आणि समृद्ध भविष्य घडवण्याचे कार्य सातत्याने करत आहे.
माडगी ग्रामपंचायतचा दृष्टीकोन म्हणजे –
धार्मिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि औद्योगिक इतिहास जपत, आधुनिक सुविधा व तंत्रज्ञानावर आधारित आदर्श, हरित, स्वच्छ आणि सर्वसमावेशक गाव विकसित करणे. गावातील प्रत्येक नागरिक, महिला, युवक आणि शेतकरी यांना समान संधी देत सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाच्या माध्यमातून माडगीला राज्यातील आदर्श तीर्थक्षेत्र व प्रगत ग्रामपंचायत म्हणून सुदृढपणे उभे करणे ही आमची दीर्घकालीन दृष्टी आहे.
माडगी ग्रामपंचायत ही "स्मार्ट ग्रामपंचायत, डिजिटल ग्रामपंचायत" या दृष्टिकोनातून कार्यरत असून, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन, डिजिटल सेवा, पर्यावरणपूरक उपक्रम, आणि सर्वांगीण ग्रामीण विकास हे आमचे ध्येय आहे. "सशक्त ग्राम, सक्षम प्रशासन" हे ध्येय ठेवून गावाचे स्मार्ट व्हिलेजमध्ये रूपांतर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.